1     2     3     4     5  

Excerpts

  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०२.०८.२०१२)

    ॥ हरि ॐ ॥
     

    ॐ मन्त्राय नम: गुरुक्षेत्रम मंत्राचा पहिला भाग बीजमन्त्र आपण बघितला.

    प्रत्येक मनुष्याकडे अनेक चांगल्या वाईट गोष्टींचे बीज असते त्यामधून चांगले बीज निवडण्याचे कार्य हा बीजमन्त्र करत असतो.
    प्रत्येक मनुष्यामध्ये मग तो कितीही पापी असो की पुण्यवान परमात्म्याने त्याच्याकडील सगळी चांगली बीजे त्या मनुष्याला दिलेली असतात. जी इतर काही वाईट बीजे असतात ती प्रत्येकाच्या आधीच्या पाप-पुण्यानुसार, कर्मानुसार येत असतात. वाईट बीजे परमात्मा कधीच देत नाही. त्याने मानवास कर्मस्वातंत्र्य मात्र दिले आहे.

    काहीजण मला (परमपूज्य बापू) सांगतात, तुम्ही म्हणता तो परमात्मा अतिशय प्रेमळ आहे व त्याची आई पण तेवढीच दयाळू आहे त्यांना सगळंच कळतं मग आम्ही प्रार्थना का करावी? इथे लक्षात ठेवा ज्याप्रमाणे प्रार्थना करावी की नाही ह्या इच्छेचे कर्मस्वातंत्र्य तुम्हाला आहे त्याचप्रमाणे तुम्ही केलेल्या प्रार्थनेनुसार फळ देण्याचे कर्मस्वातंत्र्य त्याला आहे. तो कृपाळू आहे, तो कृपा करायलाच बसला आहे. प्रार्थना करणे हा आमच्या कर्मस्वातंत्र्याचा एक भाग आहे. चांगली बीजं तुमच्या देहातील, मनातील वाढवायची कशी हे "तो" बघत असतो. त्याची जबाबदारी "तो" घेतो व तुमच्यामध्ये असणारी वाईट बीजे वाढणार नाहीत ह्याची काळजी हा बीज मन्त्र घेत असतो.

    बर्‍याच जणांना माहीत असेल, शेतकरी पीक घेण्यापूर्वी नको ती बीजे काढण्यासाठी राब जाळतो. राब जाळताना पालापाचोळा, विषारी बीजे जाळली जातात ह्याचप्रमाणे आमच्या मनातील चुकीची, वाईट बीजे जाळण्याचे काम हा बीज मंत्र करत असतो.
    बीज मंत्राच्या सुरुवातीला आपण ‘ऐं’,’ ‘र्‍हीं’, क्लीं अशी वेगवेगळी बीजं बघितली. ह्यातील प्रत्येक बीजाचे मानवी देहावरील कार्य वेगवेगळं असते व जिथे ही सर्व बीजे एकवटलेली आहेत ती जागा म्हणजे हा बीजमन्त्र.
    आमच्या मनातील चुकीची बीजे जाळण्याचे काम बीजमन्त्र करत असतो. समजा एखाद्याला ‘ऐं’ व ‘र्‍हीं’ ह्या बीजांची वेगवेगळ्या प्रमाणात आवश्यकता आहे तर हे आपोआप आवश्यक तेवढे प्रमाण ह्या बीजमंत्रातून प्राप्त होत असते.
    आपण रिमोट कंट्रोलने T.V. on करतो, तेव्हा काय होते? on केल्याबरोबर लगेच चित्र येते का? कॉम्प्युटर बघितला असेल सगळ्यांनी. आज कॉम्प्युटर येणे ही काळाची गरज आहे. अजून १० वर्षांनी कॉम्प्युटर न येणारा अशिक्षित समजला जाणार. कॉम्प्युटर on केल्यावर लगेच चित्र येते का? नाही. त्याची एक यंत्रप्रणाली आहे.
    अशाच प्रकारे प्रत्येक माणसासाठी जे आवश्यक आहे त्यानुसार कार्यप्रणाली बनविण्याचे काम बीजमन्त्र करत असतो. 
    पण समजा एखाद्याने चुकीच्या गोष्टी जाळण्यासाठी एवढा राब केला की १० वर्षे तिथे पीकच नाही येणार तर चालेल का?
    म्हणजेच मानवी प्रयासांना व प्रयत्नांना मर्यादा असतात. परंतु जो कोणी हा बीजमन्त्र प्रेमाने उच्चारतो त्याची जी काही चांगली बीजे आहेत त्यांना हा परत जिवंत करतो व वाईट बीजांना नष्ट करतो.

    ह्या बीजमन्त्रापुढे आपल्याला बघायचाय तो अंकुर मन्त्र. प्रत्येक बीजाला अंकुर यावा लागतो तरच त्याचा विकास घडू शकतो.
    आपल्या घरात कांदे-बटाटे जास्त दिवस राहिले तर त्यांना अंकुर आलेला दिसतो. कुठल्याही बी मधून जर वृक्ष वाढवायचा असेल तर आधी त्याला अंकुर यावा लागतो. ही अंकुर येण्याची प्रक्रिया प्रत्येक वस्तूच्या क्षमतेनुसार वेगवेगळी असते.
    कडधान्ये आपण भिजत घातली तरच त्याला कोंब फुटतो. पण तेच कांदा-बटाटा भिजत न घालताही त्याला कोंब फुटत असतो. म्हणजेच प्रत्येक बीजाची कोंब फुटण्याची प्रक्रिया वेगवेगळी आहे.

    ह्याचप्रमाणे, आपल्या मनामध्येसुद्धा जे बीज असते त्यातून अंकुर फुटण्याची प्रक्रिया वेगवेगळी असते. जेव्हा तो प्रजापती ब्रह्मा तुम्हांला बनवतो तेव्हा तुम्हांला तो एकच बनवतो, तुमच्यासारखा कुणीही हुबेहूब (ditto) बनवत नाही. कुठलीही व्यक्ती आतापर्यंत म्हणजे अगदी सृष्टी उत्पत्तीपासूनच्या पहिल्या माणसापासून ते आतापर्यंत हुबेहुब दुसर्‍या व्यक्तीसारखी सापडणार नाही. एकाच माणसाचे ३७२ जन्म घेतले तरी त्याच internal आणि external structure वेगवेगळं असतं. तो परमात्मा प्रत्येक मनुष्यासाठी नवीन साचा बनवत असतो व एकदा का मनुष्य बनला की तो साचा तो फोडून टाकतो. म्हणून मी नेहमी सांगतो की, "सद्‍गुरुकडे प्रत्येकाची रांग वेगळी वेगळी असते"
    म्हणूनच प्रत्येकाच्या मनातील बीज, त्यासाठी लागणारी जमीन, त्यासाठी लागणारे खत-पाणी हे वेगवेगळे असते. हे ओळखूनच गुरुक्षेत्रम मन्त्राचा अंकुरमन्त्र निर्माण केला आहे.
    हा अंकुरमंत्र आमच्या मनातील जी चांगली बीजे आहेत ज्यातून अंकुर फुटू शकतो, त्यांना ताबडतोब अंकुर फोडतो. परंतु, त्याचवेळी हा अंकुरमन्त्र तुमच्या मनातील, तुमच्या प्रारब्धातल्या वाईट बीजांना अंकुर फुटू देणार नाही. तुमच्या वाईट बीजांमुळे जी काही हानी होऊ शकते ते थांबविण्याचे काम हा अंकुर मन्त्र करत असतो.
    म्हणूनच गेल्या जन्मात आम्ही डाकू असलो, वेश्या असलो तरीदेखील त्या वाईट प्रारब्धाला अंकुर न फुटू देण्याची काळजी हा अंकुर मन्त्र घेत असतो.

    पण त्यासाठी -

    "एक विश्वास असावा पुरता । कर्ता हर्ता गुरु ऐसा"


    आपण भाताचा अंकुर जमीन भेदून बाहेर आलेला बघतो, पण तोच अंकुर उलटा जमिनीत पेरुन बघा, पेरता येईल का? नाही येत. अंकुर अत्यंत नजूक असतो.
    म्हणजेच कडक अशी जमीन भेदून बाहेर येण्यासाठी त्या अंकुराला किती मोठी energy लागत असेल? त्या लहानश्या कोंबात एवढी कडक जमीन भेदून वर येण्याची ताकद "तो" निर्माण करत असतो व हीच ताकद तुम्हाला अंकुर मन्त्र देतो.
    कल्पना करा तुम्ही एक बीज आहात व त्यातून अंकुर फुटून तुम्हांला वर यायचे आहे. त्या कडक बीजाला व जमिनीला छेदण्यासाठी ताकद लागेल ना. माझ्या जीवनातील अंधार छेदून, नशिबाचा खडक छेदून, प्रारब्धाचा कडा भेदून मला बाहेर यायचे आहे, त्यासाठी तेवढीच प्रचंड ताकद लागणार ना. जेवढी ताकद बीजाचा अंकुर बाहेर येण्यासाठी लागते तेवढीच ताकद तुमच्या मनाला प्रारब्धाच्या अंधारातून बाहेर यायला लागते व ही ताकद म्हणजेच प्रयासांची ताकद. 
     
    आपण नेहमी म्हणतो, मी प्रयत्न करेन. प्रयत्न म्हणजे "I will try"  पण जेव्हा खरोखरच करायचे असते तेव्हा काय म्हटले जाते, "I will put all my efforts" म्हणजेच प्रयास. ज्याला definate शिस्त व सातत्य आहे तो प्रयास. प्रयासातूनच पुरुषार्थ घडतो. अंकुर मन्त्र आम्हाला आमच्या नशिबाला भेदण्याची ताकद देतो.

    आता तुम्ही म्हणाल, समजा माझं बीज कडक खडकाखाली आहे, मग त्याला कोंब कसा येणार? पण ह्याची काळजी तुंम्हाला कशाला?
    एखाद्या मनुष्याने सायकलच्या mechanism  चा अगदी ३ वर्षे नीट सर्वांगाने अभ्यास केला तर त्याला सायकल चालवता येईल का? त्यासाठी आधी सायकल घेऊन चालवून बघा, २-४ वेळा पडा. हे प्रयास असतात.
    दादा सांगतात १०८ वेळा जप करा. तेव्हा एक दिवस नीट जप केला जातो. दुसर्‍या दिवसापासून कधी तो एकदा १०८ वेळा पूर्ण होतोय इकडेच लक्ष असते. असं करू  नका. जप करताना प्रेमाने करा.
    जप करत असताना मन भटकू शकेल. पण खरा सद्‍गुरु तुमचं मन जिथे मला (परमपूज्य बापू) म्हणजे जो कोणी "तो" आहे त्याला ज्याठिकाणी हवे आहे, अश्याच ठिकाणी भटकवेल. त्यामुळे त्याचं काम त्याला करू द्या. त्याच्या कामात नाक खुपसू नका. आम्ही म्हणतो आमचं नशिबच फुटकं त्याला साईबाबा काय करणार? असा तुमचा साईबाबांवरचा विश्वास. हे तुम्ही बाबांचे गुणसंकीर्तन करता की दोषसंकीर्तन.

    दामू अण्णांच्या कथेत - पत्र उघडायच्या आधीच बाबा म्हणतात, "काय म्हणतो तो दामू?" त्यावर माधवराव म्हणतात, "काय बाबा, तुम्हाला माहीत आहे तर कशाला वाचायला सांगता?  बाबा सांगतात, "मला काही माहीत नाही, वाच तू पत्र." पत्र वाचल्यावर बाबा स्पष्ट सांगतात,  "आहे त्यात सुखी रहावे, धंद्याच्या मागे लागू नये."
    पुढे दामू अण्णा स्वत: शिरडीस येऊन परत बाबांना विचारतात तेव्हा बाबा त्यास म्हणतात, "आपून नहीं रे बापू किसीमें" इथे मात्र दामूअण्णा ऐकतात. ते अधम शिष्य नाहीत ते त्या धंद्यात पैसे गुंतवत नाहीत. पुढे त्याच्या मित्राला त्या धंद्यात तोटा येतो तेव्हा तो मित्र म्हणतो "तुझा साईच खरा दाणा " भक्त करुणा केवढी.
    ह्याच दामू अण्णांची अजून एक गोष्ट आपण बघतो. ह्याची दोन लग्ने होतात. दुसर्‍या लग्नाला १२ वर्षे  होऊनही मूल होत नाही तेव्हा बाबांकडे येतात. बाबा लक्ष देत नाहीत. दामू अण्णा मशिदीतच बसून असतात. तेव्हा माधवराव आंबे घेऊन येतात. त्यातील ४ आंबे बाबा दामूअण्णांना त्यांच्या धाकट्या बायकोला द्यायला सांगतात. नंतर तिला पुढे मुले होतात.
    अशीच एक दुसर्‍या स्त्रीची कथा आहे. तिला सावत्र मुलगा असतो. स्वत:लाही मूल व्हावे, अशी तिची इच्छा असते. माधवरावांना ती भेटते. माधवराव म्हणतात, "नारळ, उदबत्ती घेऊन बस मशिदीत, खूण केली की वर ये." माधवरावांचे बाबांवर प्रचंड प्रेम. विषारी साप चावला तरी अन्य कुठेही न जाता ते बाबांकडेच फक्त धाव घेतात.
    माधवराव बाबांच्या हातात नारळ देऊन सांगतात त्या स्त्रीच्या ओटीत घालायला सांगतात, तेव्हा बाबा म्हणतात, "अशी नारळ देऊन काय पोरं होतात." तेच दामूअण्णांच्या बाबतीत मूल व्हावं म्हणून आंबे दिले होते. रतनजी शेटना पहिल्या भेटीतच मूल होणार म्हणून सांगितले.
    म्हणजेच प्रत्येकांसाठी त्याची वेगवेगळी यंत्रणा असते. कुणासाठी कुठली यंत्रणा कुठलं software वापरायचे हे तो ठरवत असतो. त्याचा तुम्ही विचार करु नका.

    तुमच्या बीजाला कसा अंकुर आणायचा हे तो नीट जाणतो. कारण तोच ह्या मन्त्राचा उद्‍गाता आहे.
    साईसच्चरित पंचशील परीक्षा आम्ही का द्यायची? कारण जेव्हा आम्ही अभ्यास करतो तेव्हा ह्या कथा आम्हांला अधिक चांगल्या प्रकारे समजतात. आज प्रत्येक भाषेत साईसच्चरित उपलब्ध आहे. ही परीक्षा आमची भक्ती अधिक चांगली होण्यासाठी असते.
    पूर्वीच्या काळी संध्याकाळच्या वेळी मंदिरात कीर्तन व भजन करणे नित्यक्रमातला आवश्यक भाग असायचा. आज हे सर्व नाहिसे झाले आहे. दरवर्षी पूर्वी प्रत्येक तिथीप्रमाणे मग ती रामनवमी असो, आषाढी एकादशी असो त्या दिवसाच्या महात्म्यानुसार कीर्तने व्हायची ज्यांनी हीच दरवर्षी होणारी कीर्तने नव्याने ऐकली त्यांचे आयुष्य बदलले.
    ३२ व्या अध्यायात हेमाडपंत म्हणतात,


    "साईमुखीचे आलाप पाप संताप हरिती"


    साईनाथ स्वत : सांगतात,


    "कृतांताच्या दाढेतून । काढीन निजभक्तां ओढून ।
    करिता मत्कथा श्रवण । रोगनिरसन होईल॥"


    हे रोगनिरसन नुसते शरीराचे नाही तर मनाचेही होते. पण त्यासाठी आधी श्रद्धा असावी लागते व  ही श्रद्धा वाढविण्यासाठी पण हा अंकुरमन्त्र मदत करणार आहे.
    ह्या मंत्रातच सगळ्या शुध्दी केलेल्या आहेत त्यामुळे हा मंत्र म्हणण्यासाठी कुठल्याही शुध्दीची आवश्यकता नाही.
    पाषाणालाही पाझर फोडण्याची ताकद ह्या मंत्रात आहे. पुढच्यावेळी आपण ह्या मंत्राचे पहिले पद बघणार आहोत. ’’ ॐ रामात्मा श्री दत्तात्रेयाय नम:’’ रामरक्षेच्यावेळी  आपण राम म्हणजे काय ते बघितले, ग्रंथराजात दत्तात्रेयांविषयी बघितले, मग उरले काय? तर जे उरले आहे तेच आपल्याला पुढच्यावेळी बघायचे आहे.

    माझी आई माझ्या लहानपणी नेहमी म्हणायची ’’हा चक्रमादित्य कधी काय करेल ते सांगता येणार नाही !!’’ मला आधीपासूनच वेडी माणसं फार आवडतात. प्रेम जर करायचे असेल तर प्रेमात वेडंच व्हायला पाहिजे अभ्यास करायचा तर अभ्यासाचं वेडंच लागायला पाहीजे.
    देवावर प्रेम करायचे तर ती दिवानगी आलीच पाहिजे. वेडे म्हणजे रस्त्यावर फिरतात ते वेडे नव्हे तर हे वेडेपण म्हणजे शहाण्यातलं वेडेपण
    मी सगळ्या पागलांचा बादशहा आहे. ह्याचे कारण माझी आई! तिचं वेड प्रेम. तिची क्षमा मला पागल करून टाकते.
    आपण आज सर्वांनी प्रार्थना करूया, ’’ आमच्या मनातील पवित्र पागलपणाला अंकुर फुटू देत.’’
    वेडात मराठे वीर दौडले सात’’ ह्या दिवानगीतच सगळं काही आहे. एक १६ वर्षाचा पोर शिवाजी, एक खास मित्र व आणखी १०-१२ पोरं सोबत घेऊन एक - एक करत तीन किल्ले काबीज करतो आणि त्याची आई ह्यासाठी त्याला परवानगी देते, हा वेडेपणा आपल्यात यायला हवा. साईसच्चरितात आपण असेच वेडे बघतो. हेमाडपंत काय सांगतात बाबांना,
     

    मी तो आपुल्या पायांचा दास
    नका करू मजला उदास
    जोवरी या देही श्वास
    निजकार्यांसी साधुनि घ्या


    ५२ वा अध्याय पूर्ण करण्याआधीच लेखणी व मस्तक साईचरणी अर्पण करुन स्वत:चे जीवन संपवणारे हेमाडपंत व त्याच कुळातील मीनावैनींनी ३२ लक्षणे बघितल्यावर आता त्याचा मोठेपणाही नको म्हणून तृप्त होऊन गेली. साधनाताई अतिशय श्रीमंत व प्रसिद्ध प्राध्यापिका पण सगळं ऐश्वर्य सोडून अनवाणी गोविद्यापिठम्‌ मध्ये सगळीकडे फिरत असे. हा वेडेपणा नाहीतर काय?

    हा पवित्र वेडेपणा आहे आणि हाच आपल्याला शिकायचा आहे. आता ज्यांना हा वेडेपणा मिळवायचा आहे त्यांनी माझ्यासोबत गुरुमन्त्र म्हणायचा व ज्यांना हा वेडेपणा नको आहे त्यांनी तोंड बंद ठेवायचे ok.

    ॥ हरि ॐ ॥
     

  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)

    ॥ हरि ॐ ॥
    श्रीगुरुक्षेत्रम्‌ मन्त्र, अंकुर मन्त्र त्याच्यामधल्या अतिशय महत्त्वाच्या पदावर आपण आहोत. हे पद खूप दिवस चालू राहू शकत ह्यात आपल्याला खूप काही शिकायच आहे. पुढच्या आठवड्यापासून मला इथे एक बोर्ड पाहिजे म्हणजे आपली शाळा सुरू झाली. ‘वर’ शद्ब आपण पुराणात वाचतो, ह्याला अमुक वर मिळाला त्याला तमुक वर मिळाला. त्यानंतर पत्रिकेमध्ये ‘वर आणि वधू’ मध्ये वर हा शद्ब आपण पाहतो. वर ब्रह्मर्षी देतात ते जे बोलतात ते खरं होतं. वरदान म्हणजे आपण म्हणतो ‘ह्याच्याकडे जन्मजात संगीताचं वरदान आहे.’ जन्मजात आहे म्हणजेच फार मेहनत करावी लागली नाही. मनुष्याला स्वत:ला काही मेहनत करावी न लागता जे सुंदर भव्यदिव्य मिळत ते वरदान असत. ऋषी तपश्चर्या करतात मग त्यांना वर मिळतो. तर काही ठिकाणी साध्याशा गोष्टींनी देव प्रसन्न होतो आणि वर देऊन जातो, एकाला दहा वर्षे तर एकाला एक दिवस. देव त्याच्या मनाला येईल तसे वागत राहतो. हा देव मोठा लहरी आहे. माझ थोड उशीरा आणि कमी भलं करतो तर इतरांच लवकर आणि जास्त भल करतो, हा देव काही सरळमार्गी नाही. हा मनाला येईल तस वागतो. पण तस कधीच नव्हतं, नसेल, आणि नाहीए.
     
    ‘वर’ शद्बाचा मूळ अर्थ मनुष्याच्या मानवी जीवनातील मानवी प्रयासाच्या मर्यादा जिथे संपतात जर ती व्यक्ती श्रद्धावान असेल तर तिथे परमेश्वराच्या सामर्थ्याचं connection आपोआप जोडलं जात. जेव्हा मनुष्याच्या प्रयत्नांमध्ये गुणात्मक जास्त गुणात्मक फरक पडणार नाही असे दिसते, तेव्हा चण्डिकाकुल, परमेश्वर आपोआप connection जोडून त्याला extra ताकद, यश देतात. म्हणजे जर पूर्वी १०० ग्रॅम प्रयत्नांना १० ग्रॅम यश मिळत होत, तिथे १० ग्रॅम प्रयत्नांना १०० ग्रॅम यश मिळते. हे connection केव्हा जोडल जात जोपर्यंत तुम्ही मानवी प्रयास पूर्णपणे मनापासून करता तेव्हा तो भगवंत connection आपोआप जोडतो. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकाला वेगळे नियम लावतात. कर्माचा अटळ सिद्धान्त सर्वांना समान असला तरी चण्डिकाकुल व तिचा पुत्र परमात्मा प्रत्येकाला वेगळे नियम लावतात त्यामुळे अनेक problems सुटतात.
     
    नेहमी पहिल्या आलेल्या व्यक्तीला पुढे न्यायचे ठरवले तर काय होईल? बाकीचे कधीतरी पुढच्या वर्गात जातील का? उदाहरण म्हणून मीनावैनी, चौबळ आजोबा ह्यांना जेवढे marks मिळालेत त्यांच्या पटीत mark मिळाले तर तुम्ही वर याल अस असेल तर कोणी पास तरी होईल का? म्हणून प्रत्येकाला तो वेगळे नियम लावतो. प्रत्येक मनुष्यासाठी त्याच्या जीवनाच्या कालखंडानुसार वेगवेगळे नियम ती चण्डिका आणि तिचा पुत्र लावतात. फक्त दोनच गोष्टी fix असतात - १) कर्माचा अटळ सिद्धान्त आणि २) पावित्र्य हेच प्रमाण. ह्याला अनुसरुनच ते partiality करतात. ताकद असतानाचे नियम तुम्हाला ताकद नसताना लावले तर, लहानपणीचे नियम वयस्कर झाल्यावर लावले तर घोटाळे होतील. म्हणून स्वत:ची तुलना कधीही दुसर्‍याशी करू नका. परमेश्वराची कृपा दुसर्‍यावर किती झाली आणि माझ्यावर किती झाली ह्याची तुलना करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ज्याला हिरा खरा का खोटा माहित नाही तो हिर्‍याची तुलना कशी करणार. आम्ही परमेश्वराची कृपा बघितली नाही. परमेश्वर बघण लांब राहिल तो अनंत आहे त्याला समजून घेण शक्यच नाही. आम्ही लहान आहोत म्हणून परमेश्वराला आम्ही कसे जाणून घेणार. तर परमात्म्याची कृपा आमच्या आयुष्यात कुठे कुठे आली ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. आपल्याला कळायला लागल्यापासून आमच्या जीवनात किती सुंदर गोष्टी घडल्या हे आठवलं की आपोआप आम्हांला परमेश्वराची कृपा नीट समजू शकते. ह्याला योगायोग मानू नका. ह्या जगात योगायोग नसतो. कुठलीच गोष्ट योगायोगाने घडत नसते. संकट येऊन गेल्यावर बापरे ! सुटलो - आठवा. परमात्म्याची कृपा कशी होते हे बघण्यासाठी दुसर्‍यांच जीवन बघण्याची, मूर्तीकडे बघण्याची, मोठमोठे धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. माझ्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी घडल्या. माझ्या जीवनात मी चुकीचे वागत असताना पण परमेश्वराने किती मला भरभरून दिले हे आठवा.
     
    पण मनुष्याचा मोठा problem हा आहे की त्याच्या स्मृती केन्द्रात जे मिळालं नाही, दु:ख प्रसंगाची नोंद जोरदार असतात. परमात्म्याने स्मृती दोन्ही गोष्टींची समानच दिलेली आहे. सुख म्हणजे काय तर आम्हाला मिळालेल सुख भागिले आमची सुखाची अपेक्षा. आमची सुखाची अपेक्षा अनंत असते. दु:ख म्हणजे काय तर आम्हाला असलेलं दु:ख भागिले दु:खाची अपेक्षा म्हणून दु:ख increase होत राहतं. मिळालेल्या सुखाचा आनंद उपभोगता येत नाही. मिळालेल्या सुखाचा आनन्द आम्हाला परत-परत उपभोगता आला पाहिजे. मनुष्य नेहमी दु:ख परत परत जगत असतो.
     
    मृत व्यक्तीच्या आठवणी परत परत येतात. पण ssc पास झालो कि त्याचा आनंद परत साजरा करत नाही. Degree मिळाल्याचा आनंद नोकरी मिळविण्यात हरवून जातो. लग्नाचा प्रसंग आठवत नाही, पण नवर्‍याला बायको काय बोलली आणि बायकोला नवरा काय बोलला हे चांगल आठवतं. आईचे धपाटे आठवतात पण तिचं रात्रभर जागण आठवत नाही. जो पर्यंत ती गोष्ट असते तो पर्यंत त्याची किंमत कळत नाही. आई असते तेव्हा तिची किंमत कळत नाही तिच्या स्पर्शाची ऊब जाणवत नाही. ह्या जगातील पहिली मूर्ती कशी घडली रेणूकामातेची घडली. आईवर निस्सिम प्रेम करणारा परशूराम पित्याच्या आणि मातेच्या देहाभोवती काष्ट रचलेली, अग्नी दिलाय ज्याक्षणी मातेचं मुख दिसल नाही तेव्हा त्याने दत्तात्रेयांकडे विनंती केली की एकदा मला माझ्या मातेला पाहायच आहे. आईला पाहून परमात्मा असणारा परशूराम धावत आईजवळ गेला. त्याने आईला स्पर्श करताच फक्त तिचं मुख राहिल त्यातूनच ही मूर्ती घडली. ह्या विश्वातील पहिली मूर्ती परमात्म्याच्या मातेच्या विरहामुळे घडली. आई-वडिल गेले की आम्ही रडतो.
     
    शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना मुलांना मारून मुकटून आपण पाठवतो. हल्ली मुलांचे बालपण निघून गेलयं. तारुण्यात तारुण्याची शक्ती नुसती उधळली जाते. शरीर थकलं की माझं तारुण्य फुकट घालवलं म्हणून दु:ख करतो. ह्या प्रवृत्तीमुळे माणसाच्या स्मरणशक्तीत वेदनेची तीव्रता जास्त असते. वेदना खोलवर जाते. जे दु:ख आहे ते आहे. पण ह्याची माझी अपेक्षा शून्य नाही झाली तरी माझा सद्‍गुरु माझ्या दु:खापेक्षा मोठा आहे. मिळालेलं सुख पुढच्या वटवृक्षा एवढ्या सुखाचे बीज आहे हे लक्षात ठेवा. आपल्या स्मरणशक्तीला आपल्याला training द्यावं लागत. दुसर्‍याने केलेला अपमान पटकन आठवतो पण मान आठवत नाही. इथे चण्डिकाकुलाकडून मिळणारा वर आवश्यक असतो.
     
    तिने रामाला वर दिला. तिच्यासाठी प्रत्येकाला नियम वेगळा आहे. ती रामाचे नियम तुम्हाला लावत नाही. चण्डिका आणि तिचे पुत्र माणसांशी युद्ध करत नाहीत त्यांच युद्ध असुरांशी असत. हेच आपल्याला मातृवात्सल्यविन्दानम्‌ आणि उपनिषद्‌ शिकवत. हे चण्डिकाकुल असूरांशी परिक्षा घेत मनुष्यांची परिक्षा घेत नाही.
     
    एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ।
     
    हा विश्वास मातृवात्सल्यविन्दानम्‌ आणि उपनिषदाने दिला आहे. मनुष्याच्या चुकांमुळे वृत्रासूर उत्पन्न होतो. जो मनुष्य वाईट वागतो तो वृत्रासुराच्या प्रभावाखाली गेलेला आहे.
     
    जो नियम ती रामाला लावते ती तो नियम आम्हाला लावणार नाही. त्यामुळे ओझं घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. आम्हाला ब्रह्मर्षी व्हायचं नाही. आम्हाला प्रपंच प्रेमाने करायचा आहे त्याबरोबर परमार्थातही प्रगती करायची आहे. माझ्या भावाचा, शत्रुचा नियम ती मला लावत नाही. म्हणून श्रद्धावानाच्या शत्रुचा पराजय होऊ शकतो. पण आमची अपेक्षा असते तिने जेव्हा आम्हाला पाहिजे तसे नियम तिने आम्हाला लावावेत. पण आम्हाला अक्कल किती? तिचे नियम कुठले ते माहित नाही. ती कृपा कशी करते? वातावरणात बदल कसे घडतात हे माहित नसतं. एखाद्या मोठ्या अपघातून मनुष्य वाचतो कसा? हे त्याचं काम आहे, हे तोच करू शकतो आणि त्यासाठी त्याठिकाणी धावत जायची गरज नाही हे आम्हाला समजलं पाहिजे. खेळ समजण्यासाठी खेळ बघावा लागतो, त्याचे नियम समजून घ्यावे लागतात. पण त्याचा खेळ बघणार कुठे कुठे? मग समजून कसा घेणार? डॉक्टर सांगतात ह्या मनुष्याच्या जीवनाचे दोन तास उरलेत तो मनुष्य दहा वर्ष संसार करतोय. ही परमात्म्याची लीला आहे. म्हणून शांतपणे एकच गोष्ट करायची, तिने सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवायचं -
     
    "माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते."
     
    तुमच्यासाठी ती चण्डिका आणि तिचा पुत्र परमात्मा परशूराम पण हे वाक्य उच्चारतो. म्हणजे रामासाठी फक्त एक चण्डिका आईच हे वाक्य उच्चारते. श्रद्धावानासाठी ती चण्डिकाही हे वाक्य उच्चारते आणि परशूरामही सगळ्या श्रद्धावानांच्या कानात सांगतो. आम्ही अवतारांपेक्षा डबल भाग्यवान आहोत म्हणून लक्षात ठेवा सामान्य श्रद्धावान भक्ताकडे अवताराच्या दुप्पट ताकद असते. तुमच्यासाठी चण्डिका आई आणि परमात्मा दोघेही वचन देतात. त्याच्याजवळ एक वरदान आहे तुम्हाला दोन वरदान आहेत.
     
    तुम के प्रेमु राम के दुना
     
    जन्मत: चण्डिकाआईच एक वरदान आहे - "माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते"  ज्याक्षणी देवयान पंथावर प्रवास सुरु करतो तेव्हा परमात्मा आमच्यासाठी उच्चारतो. ही दोन वरदान तिनेच दिली आहेत. तिने कानात सांगितलीत, परशुराम आम्हाला ओरडून सांगतो. तुम्ही म्हणाल बापू आमच्यासाठी काय आकाशवाणी होणार का? आकाशावाणी कोणासाठी होते - कंसासाठी तुम्ही काय कंस आहात का? त्यापेक्षा प्रेमवाणीचा स्विकार करा. आम्ही हे वाक्य कोणाच्या तोंडून ऐकलय ते लक्षात ठेवा. आम्ही हे वाक्य ऐकलयं हेही आठवत नसेल तरी काही नाही. कारण वासरू रस्ता चुकलं तरी गाय चुकत नाही. शिष्याला एकदा आपल म्हटल त्याचा मार्ग नरकात जाणारा असेल तरी हा नरकात जायला तयार असतो. आम्हाला नरक नाही हे आम्हाला माहित पाहिजे. कारण -
     
    जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥
     
    आमचा रस्ता नरकाकडे जरी जात असला तरी तिथे साई येऊन उभा राहिल. आणि जिथे साई उभा आहे तिथे नरक असूच शकत नाही. आम्हाला जी प्रारब्धाच्या नियतीची भिती दासी आहे ती नियती चण्डिकेची यत्किंचित दासी आहे.
     
    जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥
     
    हे वाक्य कधीही विसरायचं नाही. आज तुम्हाला decleare करतो जे अग्रलेख नीट वाचतात त्यांना आठवते का ते बघा तो देवीसिंह पाठीवर स्कंदचिन्ह घेऊन फिरतो. तिथेच एक शद्ब येतो श्वास शद्ब होता. ‘श्रीश्वास’ हा शद्ब नीट लक्षात ठेवा. हा आम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे सहजतेने, प्रेमाने आणि पूर्णपणे कसा? त्याच्याविषयी मला माहित नाही. जेव्हा मला माझी आई सांगेल की आता ‘श्रीश्वास’ सगळ्यांना द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला मी declare करेन, पण त्यासाठी तिने मान हलवली पाहिजे.
     
    ॥हरि ॐ॥

     

  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०४.२०१३)

    ॥ हरि ॐ॥
     
    आज हनुमन्त पौर्णिमा आहे त्याचबरोबर आदिमातेच्या उत्सवाचा दिवसही आहे. भारतात सगळीकडे आज महिषासुरमर्दिनीच्या देवळांमध्ये जत्रा असतात. असा हा आजचा पवित्र दिवस आहे आणि त्यात आज गुरुवार आहे.
     
    मनात अनेक विचार येत असतात. जो विचार नको असतो तो मनात येतो आणि हवा असणारा विचार येत नाही. ही परिस्थिती ह्या स्वस्तिक्षेम संवादामुळे नाहिशी होते. नको असलेला विचार येणे आणि पाहिजे तो विचार न येणे म्हणजे तुमचा फोकस नाही. तुमच्या बुद्धीचा मनावर control नसतो. आदिमातेची अठरा प्रभावकेंद्रे प्रत्येक मानवाशी जोडलेली असतात. प्रत्येक मनुष्य १४ वर्षानंतर व्यक्ती म्हणून स्वतंत्र होतो तेव्हा कोणतं connection तोडायचं आणि कोणतं जोडायचं ह्याचं स्वातंत्र्य त्याला असतं. ही १८ connections आम्हाला ह्या संवादातून जोडून मिळतात. weak connections नां जास्त power देण्याचं काम गुरुक्षेत्रम्‌ मध्ये होतं.
     
    आजचा दिवस अंजनामाता आणि आंजनेय हनुमन्त ह्या दोघांचाही दिवस आहे. आजचा दिवस असा आहे जो चण्डिकेचाही आणि तिच्या पुत्रांचाही आहे. म्हणूनच ह्या पवित्र दिवशी श्रीस्वस्तिक्षेम संवाद साधताना जीवनात आतापर्यंत जे काही चांगलं मिळालं आहे ते आठवायचं आणि शेवटी ‘मी अंबज्ञ आहे’ असं म्हणायचं.
    आज आपल्याला आद्यपिपादादांचे अभंग ऐकायचेत आहेत. पहिला अभंग अतिशय सुंदर आहे.
     
    ‘इंद्रधनुच्या नादात विसरतो आकाश । प्रतिमेच्या मागे सारे, आरशास पुसे कोण’
     
    आरशात प्रतिमा दिसते पण आरशाला कोणी विचारत नाही. इंद्रधनुष्याच्या नादात आकाशाला विसरतो. जे महत्त्वाचे आहे त्याच्याकडे आपलं लक्ष कमी वेधलं जातं. मूळ गोष्टीत मनुष्य जास्त interest घेत नाही. शेवटी ज्या मूळ गोष्टीमुळे इतर गोष्टी मिळतात तिला विसरलं तर इतर गोष्टी कशा मिळणार? 
    समजा एक स्त्री सुंदर स्वयंपाक बनवते नवर्‍याला सगळं काही त्याच्या आवडीचं जेवण बनवते त्याचबरोबर घरातील इतर कामेही व्यवस्थित करते. पत्नीपासून मिळणार्‍या लाभात तो नवरा interested आहे पण तिच्यावर पत्नी म्हणून प्रेम करण्यात तो interested नाही. मग ती काय तुमच्या घरची मोलकरीण आहे? पत्नीपासून मिळणारे लाभ तिच्या पत्नीत्वामुळे मिळतात.
     
    मूळ गोष्ट राखावी लागते, तर बाकीच्या गोष्टी मिळतात. आम्हाला एखादी वस्तू दिसते आहे. ती का दिसते? त्या वस्तूवर प्रकाश पडल्यामुळे दिसते आहे. पण नुसता प्रकाश असून चालेल का? जर तुमच्याकडे बघण्याची क्षमता नसती तर ती दिसली असती का? तर सगळ्या महत्त्वाची important  गोष्ट आहे बघण्याची शक्ती जी देवाने तुम्हाला दिली आहे.
     
    जीवनात जे दिसतं त्याच्या प्रतिमेत आम्ही अडकतो. आरसा स्वच्छ ठेवला नाही तर तो प्रतिमा दाखवेल का? स्वार्थ साधण्यासाठी तरी भगवंताला विसरलो नाही तरी भगवंताशी जोडून राहतो.
     
    हे अभंग हृदयाला स्पर्शून जाणारे आहेत. हे सगळ्यांच्या जीवनात जे काही घडलंय तेच सांगतात. साधी उदाहरणं दिली आहेत. जे साधं असतं तेच बेस्ट असतं. सगळ्यात बेस्ट गोष्टच सगळ्यात साधी असते हे मानवी मनाला पटत नाही आणि पटेपर्यंत जायची वेळ जवळ आलेली असते. साध्यासुध्या गोष्टी जीवनात अत्यंत आवश्यक आहेत आणि सगळ्यात बेस्ट आहेत.
     
    ॥ हरि ॐ ॥
     
  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (११.०४.२०१३)

    ॥ हरि  ॐ॥
     
     
    साडेतीन मुहूर्तामधील एक पवित्र दिवस, सर्वात श्रेष्ठ दिवस ह्या दिवसातला क्षण न क्षण पवित्र, सुंदर, शांती समाधान देणारा मानला जातो. अतिशय सुंदरपणे पवित्र भावाने आज स्वस्तिक्षेम संवाद साधायचा आहे. जे तिच्याशी बोलायचं आहे ते तिला अतिशय सौम्यपणे सांगा. ह्या सुंदर दिवसाचं पावित्र्य जपत संवाद साधुया.
     
    आज आपल्याला सुरुवात करायची आहे ह्या सुंदर पदाला - 
    ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।’. 
    तशी सगळीच सुंदर आहेत आपण ह्या मोठ्या आईचं पद पाहायचं आहे. ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:। ‘रामवरदायिनी’ ह्या एका शद्बामध्ये काय आहे हे लक्षात येतं. ह्याचा मूळ अर्थ रामाला वर देणारी हा आहे. ह्यात सात अक्षरे आहेत. हे नाव खूपच वेगळे आहे. कारण हा तिचा अवतार पण वेगळा आहे. हा सहावा अवतार आहे.
     
    तिचं मूळ नाव काय आहे - महिषासुरमर्दिनी. हे नाव कसं आहे जो महिषासुर आहे, त्याचा नाश करणारी म्हणजे तिचं मूळ नाव नाहीच. तिचं अस्तित्व म्हणजेच महिषासुराचं अनस्तित्व. अशीच ती रामासाठी युद्धभूमीवर प्रकटली कारण रावण मरत नव्हता म्हणून आणि काकासुर आलेला आहे. हा काकासुर कोण आहे, आपण मातृवात्सल्यविन्दानम्‌ मध्ये बघतो, हा शुंभाचा पुत्र आहे. प्रेमप्रवासमध्ये आपण पाहिलंय रावण म्हणजे काय? इथे लक्षात घ्यायचं आहे  हे असं स्वरूप आहे ज्या रूपात तिने एक मोठं समीकरण घातलेलं आहे आणि सोडवलेलंही आहे. राम वर आधी ‘रा’ आणि नंतर पुन्हा ‘र’ आणि मग ‘दायिनी’ ‘श्री’ बाजूला काढून आपण ‘रामवरदायिनी’ कसं फोड करून लिहिणार - र + आ + म + व + र + द + आ + य + इ + न + ई. ‘न’ चा ‘ण’ कसा होतो तर ‘र’ च्या सान्निध्यात ‘राम’ नाम तसंच आहे पण ‘रावण’ नावाचा तिने चोळागोळा केलाय, त्याला उलटंपालटं केलयं. म्हणजेच तिच्या ह्या नामात ज्याच्या हातून शत्रूचा नाश करायचा आहे आणि ज्याचा नाश करायचा आहे, ज्या शत्रूचा नाश करायचा त्यांची नाव आहेत. जो शत्रू आहे, त्याचं नावसुद्धा तुकडे तुकडे करून आपल्या गर्भात तिने ठेवलेलं आहे. ही रामवरदायिनी रामाला वर देणारी आहेच आणि ती प्रत्येक मनुष्यालासुद्धा बेसिक सांगते की ‘रामनाम’ हेच नाव रावणाचा नाश करण्याचं महत्वाचं शस्त्र आहे. सर्व श्रद्धावानांना दिलेला वर आहे. ह्या नामात रावणाला मारणारा ‘राम’ आहे, तुकडे तुकडे झालेला, खंडित झालेला ‘रावण’ पण आहे आणि ‘ईकार’ ही आहे ‘ईकार’ म्हणजे ‘शक्ती’. रामानामात तिची स्वशक्ती आहे, ती धारण करून तिने अवतार घेतलेला आहे आणि रामाकडून तिने रावणाला मारविले आहे. तुमच्या जीवनात रावण आला तर घाबरायचे कारण नाही.
     
    ही रामवरदायिनी ह्या मन्त्रामध्ये तिच्या नामासकट रावणाचा वध होऊन बसलेली आहे. म्हणून आरतीत काय आहे? आरतीत आपण काय म्हणतो - ‘षष्ठीते श्रीरामवरदायिनी । अशुभनाशिनी रक्ष चण्डिके ।’ सध्या शुभंकरा नवरात्र सुरू आहे. ह्या नवरात्रीला ‘शुभ’ का म्हणतात. रामाचा जन्म झाला त्यावेळी ही नवरात्र संपते म्हणून. अश्विन नवरात्रीला रावणाचा मृत्यू झाला म्हणून ती अशुभनाशिनी नवरात्र आहे. ही आदिमाता शुभंकरा असताना, अशुभनाशिनीही आहे. त्यासाठी तिने दोन टोकाची नामं धारण केली आहेत. तो जो कोणी शत्रू आहे, त्याचं नाव तिने मूळनाव म्हणून धारण केलं आहे. जो शत्रूचा नाश करणारा आहे त्याला वर देणारी आहे. तिने तिच्या मूळ धर्माला अनुसरून नाश केलेल्या शत्रूचं नाम धारण केलं आहे. हे नाव ह्या मन्त्रात आलं त्याचं हे background आहे. हेच इथे फिट आहे. ह्या मन्त्राचा (गुरुक्षेत्रम्‌ मन्त्राचा) प्रत्येक शद्ब प्रचंड मोठी समीकरणं सोडवणार आहे तुमच्या नकळत.
     
    आपलं शरीर असंख्य अणूंनी बनलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असंख्य पेशी आहेत, केमिकल्स आहेत, असंख्य अणू आहेत. अणू प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन च्या पुंजक्यांनी बनलेला असतो. म्हणजेच आपलं अख्ख शरीर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन ह्यांचे पुंजके आहेत. हे नातं महाप्राण maintain करतो, त्याला प्रेरणा अंजनामाता म्हणजे आदिमाता देत असते. प्रत्येक अणूला टिकवून हनुमन्त धरतो. त्याला चालना चण्डिका देते. एका अणूचं रूपांतर दुसर्‍या अणूत होतं ते ती करते. सगळी रचना तिचीच आहे. म्हणजे आम्ही पापं करतो ते आदिमाता करते का? वस्तूचे कण आहेत तसेच विचारांचे कणही आहेत. ह्या कणांना इच्छा शक्तीची मोकळीक तिने दिलेली असते, त्यात ती ढवळाढवळ करत नाही, आणि तिच्या मुलांनांही ती ढवळाढवळ करू देत नाही.  माझ्या इच्छा, विचार, निवड चुकली तरी त्या विचारकणांवर माझीच सत्ता चालत असली, त्यांना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे असलं तरी, त्याचात बदल करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. चुका करण्याचं स्वातंत्र्य तुमच्यात आहे, आणि चुका दुरूस्त करण्याचं सामर्थ्य चण्डिकाकुलात आहे. तुमच्या चुका लक्षात आल्या तर जसे जमेल तसे नामस्मरण करायला सुरुवात करायची, चुका दुरुस्त करण्याच्या मागे लागायचं त्यांना आवरण्याची सत्ता तिला आहे.
     
    लहानपणी भोवरा फिरवलात त्याला नुसती दोरी बांधून चालेलं का? नाही. त्यासाठी skill यावं लागतं. सुरुवातीला ते येत नाही पण नंतर प्रॅक्टिसने ते येतं. मग तो भोवरा कसा फिरवायचा ते स्वातंत्र्य आहे. पण त्याच वजनाचा ठोकळा दिला तर तो फिरेल काय? नाही कारण तो भोवरा नाही. जेवढी तुमची इच्छाशक्ती, क्रियाशक्ती महत्त्वाची आहे, तेवढचं वस्तुमानही महत्त्वाचं आहे. आम्ही चुकत असू, भोवरा चुकीच्या ठिकाणी आपटत असू तरीही त्या आदिमातेने आमच्या हातात भोवरा तर दिला आहे. विचार करणार्‍या मेंदूच्या पेशी तिने दिलेल्या आहेत. त्यांना चालना देण्यासाठी ती अंजनामातारूपाने सुप्तावस्थेत असते, आणि तिचा पुत्र महाप्राण शरीरात असतो. देवीसिंह युद्ध कसं करतो हे आपल्याला माहीती आहे, माझ्या विचारांना तुझ्या चरणांवर सोपवलं आहे, हे त्या देवीसिंहाला सांगावं लागतं. ज्या क्षणाला तुम्ही त्याला हे सांगता, तेव्हा तो मेंदूतल्या योग्य पेशींना प्रेरित करतो. तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे, पण तुमच्यासाठी ती उचित नसेल तर तो अशी परिस्थिती निर्माण करतो की तुमचे चुकीचे विचार लगेच थांबतात. तुमच्या रस्त्यात तो आडवा येतो, त्यामुळे तुम्हाला हवीशी वाटणारी गोष्ट तो प्रेमाने दूर करतो आणि तुम्ही म्हणता देव माझ्याशी किती कठोर वागतो.
     
    अनिरुद्धावरचा विश्वास, गुरुक्षेत्रम्‌ मन्त्रावरचा विश्वास, आणि त्याच्या आईवर तुमचं प्रेम असेल, तर आम्हाला घाबरायचं कारण नाही. ती स्वत: गुरुक्षेत्रम्‌ मन्त्रात आमच्यासाठी एकाच वेळी शुभंकरा आणि अशुभनाशिनी बनून आलेली आहे, ती श्रद्धावानांसाठी आधी शुभंकरा नंतर अशुभनाशिनी किंवा आधी अशुभनाशिनी आणि नंतर शुभंकरा नसते. ती एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडवून आणते.
     
    हा देवीसिंह जो आईच्या समोर तोंड करून उभा आहे तो कसा आहे? सगळीकडे देवाचं वाहन देवाकडे तोंड करून बघत असतं. पण हा एकच असा आहे जो त्या आदिमातेसमोर जो कोणी उभा आहे त्याच्याकडे तोंड करून नेहमी attenation position मध्ये तो असतो. हा तिच्याकडे जो कोणी बघताहेत त्यांच्याकडे बघतोय. तिच्यासमोर कोण येतो त्यांच्याकडे हा बघतो. महिषासुरासारखा आदिमातेचा शत्रू असेल त्याचा नाश करण्यासाठी हा झेप घ्यायला तयार आहे आणि प्रेमळ भक्त असेल तर त्यांच्यावरही हा झेप घ्यायला तयार आहे पण कशासाठी त्यांच्यामागून येणारा शत्रू, संकट ह्यांचा नाश करण्यासाठी. मनुष्य देवाकडे धावत केव्हा येतो, जेव्हा तो संकटात येतो. हे एकमेव दैवत असं आहे, श्रद्धावानांकडे तोंड करून attention मध्ये उभा आहे. ‘युगे अठ्ठावीस उभा’ कुठल्याही क्षणी झेप घेण्यासाठी तो तयार आहे. आदिमातेचा शत्रू असेल तर त्याचा नाश करण्यासाठी झेप घेतो, आणि श्रद्धावान भक्तावर त्याच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी  झेप घेतो. उपनिषद्‍ मध्ये शेवटचा अध्याय परशुराम आणि त्रिविक्रमाचं  नातं सांगतो.
     
    ह्या गुरुक्षेत्रम्‌ मन्त्राचा प्रत्येक शद्ब फार वेगळी वेगळी समीकरणं सोडवत राहतो. ह्या पदातली सगळी प्रमुख समीकरणं मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या मन्त्रातील सगळी समीकरणं तुमच्या जीवनातील सगळ्या problems ची समीकरणं सोडवतील. चुकीच्या गोष्टीचं निराकरण, पापाचा नाश, अयोग्य ते नाश करणं, कमी आहे ते भरून करण्याची ताकद तुमच्या जीवनासाठी प्रत्येक गोष्ट देणारा आहे. गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र समीकरण नाही तर तुमच्या जीवनात जे problem आहेत, समीकरणं आहेत त्याचं प्रत्येक  solution ह्या मन्त्रात आहेच.
     
    पुढच्या वेळेस आपण ह्या सात अक्षरांबद्दल शिकणार आहोत. आजच्या शुभंकरा नवरात्रीपासून आपण सुरुवात केली आहे. आपल्याला आनंद करायचाय, हया गंगेत डुबक्या मारायच्या आहेत. तुम्ही ह्यात बुडणार नाहीत हे लक्षात ठेवा. ह्या मन्त्राने अवगाहन करायचं आहे. आता आपल्याला हा गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र कसा समीकरण सोडवत जातो ते पहायचं आहे. हे बरेच दिवस चालणार आहे. काळोखात चालत असताना माणसाचा हात धरलाय ज्याला पाऊल वाट माहितेय, तरी भीती वाटतेच की पायाखालून साप किंवा आणखी काय गेलं तर, पण जर प्रकाश असेल आणि bodygaurd पण बरोबर असेल तर भीती कसली? ह्या गुरुक्षेत्रम्‌ मन्त्रावर खूप प्रेम करा, प्रेमाने हा मन्त्र म्हणा. ह मंत्र तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण करणार आहे. हा गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र कसा निर्माण झाला व कोणी प्रथम म्हटला, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ह्या आयुष्यात नाही तर, प्रत्येक आयुष्यात अनुभवायचं आहे.
     
    ॥ हरि ॐ ॥
 
 
  1     2     3     4     5  
 
 
Manasamarthyadata Latest News

Marathi

अनिरुद्ध साईंची खूण पटली

Hindi

ANUBHAV PUBLISHED IN HAMARA MAHANAGAR NEWSPAPER - 6 Apr

English

I will never abandon you!

Gujarati

ઉપાય પાસે હોય તો પછી શા માટે બહાર અટવાયા કરવું?

Kannada

ಅನಂತ ವ್ಯಾಪಕತ್ವ

Read All Experiences

Excerpts

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०४.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (११.०४.२०१३)

Read Blog Rolls Submit Your Views Post Your Anubhavs